(मुंबई)
भिंवडी येथील ओबीसी मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका करताना त्यांना बेवडा संबोधले. भुजबळ म्हणाले की, आधीच मर्कट त्यात मद्य प्याले. जरांगे मला पाहून घेण्याची भाषा करतो, पण आधी स्वत:ची तब्येत सांभाळा. दारू पिऊन किडन्या खराब झाल्या आहेत. जरांगे काहीही बोलतो, मला म्हणतो येवल्याचा येटपट. ओबीसींचं आरक्षण म्हणे एकटा भुजबळ खातो, अरे ते खायला काय लाडू पेढा आहे का? तू खातोय ना सासरच्या घरी भाकरीमग खा. या टीकेनंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पलटवार केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, त्यामुळे मी त्याला (भुजबळ) येटपट म्हणतो. मला सासऱ्याच्या घरचं खातो म्हणतो पण तो येवल्यात सासूच्या घरचं खातो. माकड काय करू शकतं? ते जरा रावणाला विचार. तुझी लंकाही जळेल, जरा नीट राहा. मी त्याला जाहीर आव्हान करतो की, माझी नार्को टेस्ट करा. जन्मापासून आतापर्यंत माझ्या शरीराला दारुचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो अन्यथा भुजबळांनी जिवंत समाधी घ्यावी, हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे. तू काहीही बोलू नको, मापात राहा, असं खुलं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं आहे.
जरांगे पाटील भुजबळांना उद्देशून म्हणाले की,तो प्रचंड जातीवादी आहे. तो महामूर्ख माणूस आहे. त्यामुळेच मी त्याला येडपट म्हणतो. माझ्या शरीराला जन्मापासून दारुचा स्पर्श नाही. हे शरीर जनतेसाठी लढून झिजलं आहे. तुझ्यासारखं लोकांचं रक्त पिऊन फुगलं नाही.
भिवंडीमधील ओबीसी निर्धार महामेळाव्यात बोलताना भुजबळ म्हणाले, आम्हाला आणि सरकारला धमकी दिली जाते, पोलिसांवर हल्ले केले जातात. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, मात्र आम्ही शांतता बिघडवत असल्याचा आरोप होतो. आमचे लोक त्यांना सलाम करायला जातात. मनोज जरांगे यांच्यापुढे किती झुकणार, असा सवाल करत त्यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी भुजबळ यांनी जरांगेंवर तीव्र शब्दांत टीका केली. महात्मा गांधी यांनी उपोषण केल्यावर त्यांना व्हॉईसरॉय भेटायला जायचे, त्याप्रमाणे आमचे लोक जरांगेंना भेटायला जातात, त्याच्या पाया पडतात, विनंती करतात आणि त्याला डोक्यावर चढवतात, हे काय नाटक आहे, असा सवाल त्यांनी केला.
गेली ३५ वर्ष ओबीसी समाजाच्या आरक्षणाची लढाई लढत आहे. समाजातील कोट्यवधी लोक मागासलेले आहेत. त्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक आरक्षण मिळायला हवे. आता कुठे थोडेसे आरक्षण मिळाले आहे, त्यात पण वाटेकरी होत आहेत. त्यासाठी हा लढा आहे, असे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या आणि खोट्या कुणबी दाखल्याद्वारे दिलेले आरक्षण रद्द करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली