शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधक हा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करत आहेत तर शिंदे गटाकडून हा दिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला गेला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार सत्तेवर आले. त्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. आता या बंडाविषयी दीपक केसरकर यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता तर ते स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते असा धक्कादायक खुलासा केसरकर यांनी केला आहे.
शिवसेनेतील उठावाबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होते की, माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही असं वाटायला लागलं असतं, तेव्हा मी एकच गोष्ट केली असती. माझ्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झाली आहे, पण या लोकांची काही चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं. एक वर्षानंतर दीपक केसरकर यांनी या बंडाबाबत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड फसले असते तर त्यांनी स्वत:ला संपवलं असतं, असं केसरकर म्हणाले.
दीपक केसरकर म्हणाले, असं विधान करणारा माणूस कोणत्या दर्जाचा असतो, कशा प्रकारची माणुसकी त्याच्याकडे असते? प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्यामुळे एकाही आमदाराचं राजकीय नुकसान होता कामा नये, असे म्हणणाऱ्या माणसामागे लोकं उभी नाही राहणार तर कोणाच्या पाठीमागे उभे राहणार असेही ते म्हणाले.
‘उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे’
ते म्हणाले, बजेटवर बहिष्कार करणार म्हटल्यावर आमच्या आमदारांना निधी मिळाला, मी त्याचा साक्षीदार होतो. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. वर्धापनदिनाच्या दिवशी तुम्ही एक नंबरच्या नेत्याचा आपमान केला, त्यानंतर मी निघून गेलो असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टिकास्र सोडलं.
चौकशीनंतर खरे चेहरे समोर येतील
मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप झालेले आहेत. ४७५५ कोटींच्या कामामध्ये अनियमितता झालेली असून काळ्या यादीतील लोकांना कामे देण्यात आली. १२ हजार कोटींच्या घोटाळ्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. आम्ही कोणाचं नाव घेतलं नाही. या चौकशीनंतर खरे चेहरे समोर येतील असे केसरकर म्हणाले.