(मुंबई)
जालन्यात मराठा समाजातील आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश मंत्रालयातून आले, असा आरोप विरोधकांनी केला. मात्र, त्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज चपखल प्रत्युत्तर दिले. लाठीमाराचे आदेश आमच्यापैकी तिघांपैकी कोणी दिले असतील, तर ते सिद्ध करा. आम्ही राजकारण सोडून देऊ, अन्यथा तुम्ही राजकारण सोडा, असे प्रतिआव्हान अजित पवारांनी उद्धव ठाकरे तसेच शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी परखड भूमिका मांडली. लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून दिले असे नुसते बोलत राहू नका. दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या. तुम्ही तुमचे आरोप सिद्ध केले तर आम्ही राजकारण सोडून देऊ, अन्यथा तुम्ही राजकारण सोडा, असे अजित पवार म्हणाले.
https://www.facebook.com/watch/DevendraFadnavisforMaharashtra/?ref=embed_video
अजित पवारांचे गाव काटेवाडीतून अजित पवारांना सत्ता सोडा, असे आव्हान दिले गेले. त्यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात 40000 गावे आहेत. तिथून कोणी काही बोलले नाही. पण माझ्या काटेवाडीतून कोणी बोलले म्हणून तुम्ही प्रश्न विचारला. मी त्या सरपंचाला त्या संदर्भात विचारले. त्यावेळी त्याने आपल्या आमच्यापैकी कोणीच काही बोलले नाही, असे स्पष्ट सांगितले. मग कोणी एक बोलतो म्हणून मी सत्ता सोडायचे काहीच कारण नाही, असे अजित पवारांनी संबंधित पत्रकाराला सुनावले.
मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गेले. त्याची जबाबदारी सरकारच्या प्रमुखांनीच घेतली पाहिजे. जर एखादी गोष्ट चांगली झाली, तर त्याचे श्रेय सरकार प्रमुख घेत असतील, तर अपयशाची जबाबदारी देखील सरकार प्रमुखांनी घेतली पाहिजे, अशा शब्दांत अजित पवारांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधले.