( मुंबई )
ठाकरे गटाचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मनोमिलन कायम राहिल्यास आपण पुन्हा एकटे लढू, असा सूचक इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे सोमवारी ओबीसी महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी एका पत्रकाराने शिवसेनेचे काँग्रेस आघाडीसोबत मनोमिलन राहिल्यास काय, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना तर आम्ही पुन्हा एकटे लढू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकर महाविकास आघडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत होते, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून प्रकाश आंबेडकर यांना त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबतची विनंती करण्यात आली नाही. एवढेच नाही तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितची आम्हाला गरज नाही, असे वक्तव्य केले होते.