(मुंबई)
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यावर त्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपकडून मुरजी पटेल उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस आहे.
अर्ज दाखल करणं आणि प्रचार करणं याआधीच निवडणुकीत रंग भरायला लागले आहेत. ही निवडणूक भाजप, शिंदे गट आणि ठाकरे यांच्यासाठी खूपच प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर तसेच पक्षाच्या नावात बदल आणि चिन्ह गमावल्यावर ही पहिलीच निवडणूक आहे. तसेच येत्या काळात होणाऱ्या मनपा निवडणुकीवरही या पोटनिवडणुकीच्या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती मते?
- रमेश लटके (शिवसेना) – 62680
- मुरजी पटेल ( अपक्ष) – 45788
- अमिन कुट्टी (काँग्रेस) – 27925
- शरद येताम (वंचित बहुजन आघाडी) – 4314
- नोटा – 4303
2019 च्या विधानसभा निवडणुकीत रमेश लटके यांना 62680 मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या अमिन पटेल यांना 27925 मते मिळाली होती. यावेळी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा त्यांना पाठिंबा दिला आहे. म्हणजेच काँग्रेसची मते सुद्धा ऋतुजा लटके यांच्या पदरात पडली तर त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
मात्र, असे असले तरी, शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि त्यासोबतच शिवसेनेचं गेलेलं नाव, पक्षाचं निवडणूक चिन्ह नव्याने मिळालं आहे. शिंदे गट आणि भाजप एकत्रित निवडणूक लढत आहेत. त्यामुळे मतदार आता कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.