गुजरात : आजकाल लग्नाबाबत काय फॅड निघेल कोणी काही सांगू शकत नाही. असाच काहीसा अनोखा प्रकारे एक लग्न होत आहे. भारतातील पहिल्या सोलोगॅमीमध्ये गुजरातची महिला स्वतःशी लग्न करणार आहे. 11 जूनला भारतात असे लग्न पाहायला मिळणार आहे, जे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. 24 वर्षीय क्षमा बिंदू स्वतःशी लग्न करणार आहे. गुजरातमधील वडोदरा येथील महिला स्वत:शी लग्न करेल. या लग्नात सर्व काही असेल. यामध्ये सप्तपदी आणि लग्नाच्या शपथेपासून ते गोव्यातील हनिमूनपर्यंत संपूर्ण तयारी असेल, परंतु या लग्नात नवरदेव नसेल.
हे भारतातील पहिले सोलो वेडिंग किंवा सोलोगॅमी असणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या क्षमाने स्पष्ट केले की, “मला कधीच लग्न करायचं नव्हतं. पण मला नवरी व्हायचं होतं. म्हणून मी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्वयं-विवाह म्हणजे स्वतःसाठी तिथे असण्याची आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता आहे. हे स्व-स्वीकृतीचे देखील एक कार्य आहे. लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे आणि म्हणूनच हे लग्न.”
क्षमा पुढे म्हणाली, “काहींना स्व-विवाह अप्रासंगिक वाटू शकतो. पण मी प्रत्यक्षात जे चित्रण करण्याचा प्रयत्न करत आहे, ते म्हणजे स्त्रिया महत्त्वाच्या आहेत.” तिच्या या निर्णयावर कुटुंबीयांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना तिने सांगितले की, तिच्या पालकांनी तिला लग्नासाठी आशीर्वाद दिला आहे. गोत्री येथील मंदिरात हे लग्न होणार आहे. एवढेच नाही तर लग्नानंतर तिने दोन आठवड्यांच्या हनिमूनला गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला आहे.