(खेड / भरत निकम)
पीडित तरुणीला कामाच्या बहाण्याने भरणे येथील रिसाॅर्टमध्ये नेवून तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवले. त्याशिवाय दिल्ली, माथेरान, लोणावळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिचे शोषण करुन तिला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका अभियंत्याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण सुधाकर डोंगरे (५६, रा. १०३, यशवंत रेसीडन्सी, भांडूप, मुंबई) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. ही घटना दि. १ नोव्हेंबर २०१९ ते २०२१ या कालावधीत घडलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला संशयित प्रवीण डोंगरे हा कामाच्या बहाण्याने भरणे येथील रिसाॅर्ट मध्ये घेऊन गेला. तिथे पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर २०१९ ते २०२१ या कालावधीत पिडितेस दिल्ली, माथेरान, लोणावळा अशा विविध ठिकाणी नेऊन तिचे शोषण केले. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२३ रोजी संशयिताने पीडित तरुणीला पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांना दमदाटी केल्याने हसनबाद पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. तेथून शून्य नंबरने हा गुन्हा खेड, जि. रत्नागिरी येथे वर्ग करुन दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली असून तक्रारीनुसार पुढील तपास सुरु ठेवला आहे.
खेड पोलिसांनी भा. दं. वि. क. ३७६, ३७६ (२) (के), ३७६ (२) (एन), ३२३, ५०९,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करून डोंगरे याला ताब्यात घेतले आहे.