(नवी दिल्ली)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत भाजप सरकार तब्बल २७ वर्षांनंतर सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. सकाळपासूनच भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. दिल्लीतील विविध जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.
कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. दिल्लीची निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत असून कार्यकर्त्यांकडून जंगी सेलिब्रेशन करण्यात येत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील 70 विधानसभा जागांवर मतदान झाले होते. यामध्ये भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. तर AAP 22 जागांवर घसरली आहे. याशिवाय काँग्रेस आपले खाते उघडण्यात अपयशी ठरले आहे. आतापर्यंतच्या निकालावरून हे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीतील विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीत विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यासोबतच त्यांनी दिल्लीतील जनतेला विकासाचे आश्वासन दिले आहे. दिल्लीचा सर्वांगीण विकास आणि इथल्या लोकांचे जीवन चांगले बनवण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. ही आमची हमी आहे. विकसित भारत घडवण्यात दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना पीएम मोदींनी लिहिले की, ऐतिहासिक विजयासाठी दिल्लीच्या जनतेचे अभिनंदन. तुम्ही मला दिलेल्या आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद.
कार्यकर्त्यांचे केले कौतुक –
पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचेही कौतुक केले आहे. सर्व कार्यकर्त्यांचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचंड जनादेशासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले आहे. आम्ही दिल्लीतील जनतेची अधिक भक्कमपणे सेवा करू, असे मोदी म्हणाले.
दिल्लीतील भाजप कार्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सामील झाले. दिल्लीत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याच्या दिशेने पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास व्यक्त केला आहे. हा आमचा आणि दिल्लीच्या जनतेचा मोठा विजय आहे, असे वरिंद्र सचदेवा यांनी सांगितले
लोकांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. महिलांना २५०० रुपये देणे, भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करणे, यमुना रिव्हरफ्रंट, प्रदूषण कमी करणे, वाहतूक कोंडी कमी करणे याला आमचे प्राधान्य असेल. सर्वांना अभिमान वाटेल असे काम आम्ही करून दाखवू, अशी ग्वाही भाजपचे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणारे प्ररवेश वर्मा यांनी दिली.
दिल्लीत आपची हॅट्रीकची संधी हुकली आहे. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांनाही परभवाचा धक्का बसला आहे. या पराभवानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हणाले, आम्ही जनतेचा जनादेश अत्यंत नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की, ज्या आश्वासनांसाठी जनतेने त्यांना मतदान केले आहे, ती सर्व आश्वासने ते पूर्ण करतील. केजरीवाल यांनी आपल्या सरकारच्या कामांचा दाखला दिला. गेल्या दहा वर्षांत आरोग्य, शिक्षण, वीज, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आम्ही बरीच कामे केली आहेत. आम्ही केवळ विधायक विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही, तर जनतेत राहून त्यांची सेवा करू. आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलो नाही. सत्ता केवळ लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचे साधन आहे. या निवडणुकांमध्ये उत्तम काम केल्याबद्दल मी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.