(रत्नागिरी)
दहावीच्या परीक्षेत पटवर्धन हायस्कूलमध्ये तन्वी विद्याधर कांबळे (९८.८०) हिने प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृत विषयात तिला ९९ गुण आहेत. यापूर्वी तिने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात १५वा क्रमांक मिळवला होता. तसेच आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात नववा क्रमांक पटकावला होता. तन्वी आपले पुढील शिक्षण घेण्यासाठी सध्या मुंबईत वास्तव्याला आहे. दरम्यान मुंबईतून रत्नागिरीतील घरी आगमन होताच ऑर्चिड सोसायटीतील रहिवाशांनी तिचे दणक्यात स्वागत केले.
आपल्या सोसायटीतील मुलीने उत्कृष्ठ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला याचा अभिमान रहिवाशांना आहे. त्यामुळे तन्वी मुंबईतून रत्नागिरीत येणार असल्याची माहिती मिळताच सोसायटीतील महिलांनी स्वागताची तयारी सुरू केली. तन्वी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पोहोचली अन् महिलांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले.
दरम्यान तन्वीला शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक असलेले वडील विद्याधर कांबळे आणि आई दीक्षा यांचेही बहुमोल मार्गदर्शन मिळाले. ती आता आयआयटीमध्ये पुढील शिक्षण घेणार आहे. त्यासाठी ती सध्या विविध परीक्षा देत आहे. तिच्या या यशाबद्दल हातखंबा येथील नंदाई प्रतिष्ठान, कास्ट्राईब शिक्षक संघटना, तारा ऑर्चिड सोसायटीतील रहिवाशांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.