(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी (खालगाव) येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मित्र मंडळ जाकादेवी खालगाव येथे दिनांक २६ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यक्रमाची उत्साहात सांगता बुधवार दि.५ ऑक्टोबर रोजी होत असून या दुर्गा देवीचा विसर्जन मिरवणूक सोहळा मलकापूर येथील रोषणाई लाइटिंग यांच्या माध्यमातून ढोल ताशांच्या गजरात संपन्न होणार असल्याने ही विसर्जन मिरवणूक जाकादेवी दशक्रोशीसाठी अतिशय लक्षवेधी ठरणार आहे.
सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र मंडळ जाकादेवी खालगाव आयोजित उत्सवामध्ये देवीचे मिरवणुकीने आगमन झाल्यानंतर आरती, गरबा, दांडिया, यांसह भजनाच्या डबलबारीचे जंगी सामने, तसेच विनोदी बोधपर कार्यक्रम, कोंकणचा साज संगमेश्वरी बाज, प्रसिद्ध जादूगार प्रसाद ओक यांचे बहुरंगी जादूचे प्रयोग, महाप्रसाद, होम मिनिस्टर२०२२ ची पहिली, दुसरी, तिसरी फेरी तसेच जाकडी डबलबारी नाचांचे आकर्षक जंगी सामने , विविध स्पर्धांचे आयोजन, मुलांचे, महिलांचे खेळ , फॅन्सी ड्रेस, फनी गेम्स अशाप्रकारे धार्मिक -सांस्कृतिक-क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजकांनी यशस्वीरित्या आयोजन केले.
हा वार्षिक व धार्मिक उत्सव अतिशय शांततेत व उत्साहात संपन्न करण्यासाठी नवरात्र उत्सव मंडळ जाकादेवी (खालगाव) यांनी खूप मेहनत घेतली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस, खालगाव बीट अंमलदार यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कोरोना नंतरचा हा नवरात्र उत्सव अतिशय मोकळ्या आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना जाकादेवीसह पंचक्रोशीतील अनेक भाविक व रसिक प्रेमींनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. मोठ्या भक्ती भावाने या दुर्गा मातेचे शेकडो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.