(मुंबई)
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान व त्याचा मुलगा आर्यन खान यांच्या अडचणी पुन्हा वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी आढळल्याचे ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने मुख्यालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालामध्ये NCB ने खळबळजनक खुलासा केला आहे. या प्रकरणात आर्यन याला क्लीन चिट मिळाल्यानंतर एनसीबीकडून चौकशी करण्यात आली.
या चौकशीचा अहवाल एनसीबीच्या ब्युरो प्रमुखांकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात ‘सिलेक्टिव्ह ट्रिटमेंट’ देण्यात आल्याचे व या प्रकरणाचा तपास योग्यरित्या झाला नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात ७ ते ८ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांची विभागीय चौकशी केली जात आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी मागण्यात आली आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणा गेल्या एक वर्षापासून सातत्यानं चर्चेत आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन तब्बल २६ दिवस कोठडीत होती. NCB कडून आर्यन खानची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान काही महिन्यांआधीच आर्यनची या केसमध्ये निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मे२०२२ मध्ये आर्यन खानला एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली. त्याचप्रमाणे त्याच्यापरदेश प्रवासाला मान्यतादेत त्यालापासपोर्टही त्याला परत देण्यात आला. आर्यन खान आणि पाच जणांविरुद्ध पुरेसे पुरावे सापडले नाहीत,असं स्पष्टीकरण NCB कडून देण्यात आलं होतं.
मुंबईहून गोवा जाणाऱ्या क्रूजवरून आर्यन खानला ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (NCB) २ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक केली होती. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी केला होता. आर्यन खानसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंटसह जवळपास २० जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या प्रकरणात आर्यन खान तुरुंगातही होता. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आर्यन खानला जामीन मिळाला होता.