(मुंबई)
मादकपदार्थांचा तस्कर अली असगर शिराझीवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने येथे छापेमारी केली. असगर हा मादकपदार्थांचा मोठा तस्कर कैलास राजपूतचा विश्वासू आहे. शिराझीवर 200 कोटी रुपयांच्या मादकपदार्थांची युरोप आणि ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप आहे.
अली असगर अंधेरी परिसरात वास्तव्याला असून, त्याचे घर आणि कार्यालयावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेने मे महिन्यात त्याला अटक केली होती. कुरिअर सेवेचा वापर करून ऑस्ट्रेलिया आणि बि‘टन येथे आठ कोटी रुपयांच्या केटामाईन आणि व्हायग्राची तस्करी केल्याच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली होती. दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याला मुंबई विमानतळावर पकडण्यात आले होते.
सात ठिकाणी छापे
अली असगर शिराझीशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि इतर काही ठिकाणांवर अद्याप छापेमारी सुरू आहे. या वर्षी मे महिन्यात अली असगरला अटक करण्यापूर्वी खंडणीविरोधी पथकाने मार्चमध्ये त्याचा शोध सुरू केला होता. पोलिसांच्या पथकाने जम्मू-काश्मीर, दिल्लीसह अनेक ठिकाणी छापेमारी केली. परंतु, तो सतत ठिकाणे बदलत होता. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला.