(चिपळूण)
चिपळूण शहरातील ड्रग्ज रॅकेटवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चिपळूण सिटिझन्स मुव्हमेंटतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन देऊन करण्यात आली. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, तसेच मान्यवर नागरिक व महिला सहभागी झाले होते. आपण या प्रकरणी लक्ष घातले असून आम्ही कठोर कारवाई करीत आहोत व यापुढेही कारवाई सुरुच राहणार असल्याचे डीवाएस्पींनी सांगितले.
चिपळूण शहरात गेल्या काही वर्षांमध्ये ड्रग्ज रॅकेट मोठ्या प्रमाणात पसरले आहे व त्याचे गंभीर परिणामही दिसून येत आहेत. असे अंमली पदार्थाचे अड्डे चिपळूण शहरामध्ये अनेक ठिकाणी तयार झालेले आहेत. विशेष करुन कॉलेजची व शाळेतीलही मुलेही या ड्रग्जच्या आहारी गेलेली आहेत. त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. पालकांना या मुलांना आवरणे व त्यांच्यावर नियंत्रण करणे कठीण होऊन गेले आहे. अनेक ठिकाणी कुटुंबामध्ये काही गंभीर प्रसंगही निर्माण झालेले आहेत. यासाठी आता आपल्याकडून काही ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
याकरिता चिपळूण सिटीझन्स मुव्हमेंट उभारले आहे. यातूनच ड्रग्ज विरोधी लढा सुरु केलेला आहे. या निवेदनात विविध सात मुद्दे समोर ठेवण्यात आले असून त्याबाबत त्वरित कारवाई अपेक्षित असून चिपळूण शहर व परिसरातील अंमली पदार्थांचा विळखा नष्ट करुन तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी मुव्हमेंटचे सतिश कदम, किशोर रेडीज, शशिकांत मोदी, करामत मिठागरी, डॉ. रहमत जबले, सावित्रीताई होमकळस, रेहाना बिजले, सुमती जांभेकर, रविना गुजर, अदिती देशपांडे, सिमाताई चाळके, रामदास राणे, विणा जावकर, अंजली कदम, सतिशअप्पा खेडेकर, मुराद अडरेकर, डॉ. विजय रिळकर, इब्राहीम सरगुरोह, नितीन गांधी, श्रीनाथ खेडेकर, दीपिका कोतवडेकर, निहार कोवळे, जगदीश वाघुळदे, अजय भालेकर, समीर काझी, आशिष खातू, शाहनवाझ शाह, नितेश ओसवाल, रईस अलवी, इनायत मुकादम, पुनम भोजने, निर्मला जाधव, यासिन दळवी, सचिन शेट्ये, प्रक्षमेश कापडी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. सतिश कदम यांनी सविस्तर याबाबत माहिती दिली, तर अदिती देशपांडे यांनी निवेदन वाचून दाखविले.