(डोंबिवली/ किशोर गावडे)
डोंबिवली पूर्वेच्या गोपाळ नगर परिसरात असलेल्या पतपेढीतून दागिन्यांची चोरी झाली. लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले तब्बल 13 लाख 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. अखेर याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर पतपेढीतील कर्मचारी महिलेनेच चोरी केल्याचं उघड झालंय.
डोंबिवलीच्या आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्थे मधून दागिन्यांची चोरी झाल्याचे समजताच या चोरीने एकच खळबळ उडाली होती. दागिन्यांच्या चोरी प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
दरम्यान, या पतपेढीत काम करणाऱ्या कर्मचारी महिलेनंच ही चोरी केली असल्याचं समोर आलंय. या महिलेला अटकही करण्यात आली आहे. सुरुवातीला पोलिसांनी संशय आल्यानं या महिलेला ताब्यात घेत तिची चौकशी केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर पतपेढीतील कर्मचारी महिलेनेच चोरी केल्याचं उघड झालं आहे.
पोलिसांच्या चौकशीला घाबरुन अखेर महिलेनं चोरी केल्याची कबुली दिली. अखेर या महिलेवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत तिला बेड्या ठोकल्या आहेत. तसंच तिच्याकडून मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. पुढील कारवाई आणि तपास टिळकनगर पोलिसांकडून केला जातोय.