(रत्नागिरी)
रत्नागिरी जि.प.च्या पशुसंवर्धन विभागात कार्यरत असलेले डॉ. विवेक पनवेलकर यांचे शुकवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५३ वर्षे होते.
डॉ. विवेक पनवेलकर हे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात कार्यरत होते. सहायक आयुक्त पशसंवर्धन तालुका, लघु पशू संवर्धन चिकित्सालय रत्नागिरी या पदावर ते होते. रत्नागिरी येथील झाडगाव पशुवैद्यकीय दवाखान्यात ते कार्यरत होते.
रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात असलेल्या वसंत विहार कॉम्प्लेक्स येथे त्यांचे वास्तव्य होते. शुक्रवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तात्काळ कुटुंबियांकडून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. दरम्यान वाटेतच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.