(चिपळूण)
हेल्प फाउंडेशन चिपळूण या संस्थेमार्फत पुरस्कार जाहीर झाले असून यावर्षी ‘प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट’ डॉक्टर यतीन जाधव व प्राईड वूमनऑफ द डिस्ट्रिक्ट, सामाजिक कार्यकर्त्या सीमा चाळके यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता हॉटेल अभिरुची येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, डीवायएसपी राजेंद्र राजमाने, प्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव हे विशेष व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश कदम यांनी दिली.
गेली १७ वर्षे हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत, सामाजिक कार्यामध्ये विशेष योगदान देणाऱ्या तसेच मानवतावादी सेवा बजावणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने यशोचित सन्मान करण्यात येतो. गेल्या १७ वर्षांमध्ये अनेक नामवंत, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये चिपळूण शहर व जिल्ह्यातील अनेक महनीय व्यक्तींचा समावेश आहे.
यावर्षी प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट या पुरस्काराने चिपळूण मधील प्रतिथयश व नामवंत डॉक्टर तसेच विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक काम बजावणारे श्री.यतीन जाधव सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ.यतीन जाधव हे चिपळूण मधील साहित्य क्षेत्राचे मानबिंदू असणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक मंदिर वाचनालयाचे अध्यक्ष असून सांजसोबत या संस्थेच्याही अध्यक्षपदाची धुरा सांभाळत अनेक संस्थावर काम करत आहेत. साहित्यासह, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या सीमा चाळके यांना ‘प्राईड वूमन ऑफ द डिस्ट्रिक्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ‘. सीमा चाळके यांनी विविध क्षेत्रात कार्यरत राहून सामान्य लोकांना शासनदरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषकरून गरीब, अत्याचारीत व असहाय्य महिलांना त्यांनी मदत केली आहे,तरी नागरिकांनी या पुरस्कार वितरण उपस्थित रहावे असे आवाहन हेल्प फाउंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.