(दापोली)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहामध्ये मंगळवार दि. २१ जून रोजी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत ८ वा आंतरराष्ट्रीय ‘योग दिवस’ हा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाकरीता श्री. विश्वास वासुदेव फाटक, माजी विद्यार्थी कृषि महाविद्यालय, दापोली तथा योग प्रशिक्षक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. श्री. अजित जाधव व श्रीमती अक्षता साळवी हे सहाय्यक योग प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात श्री. विश्वास फाटक यांनी योगाच्या विविध प्रकारांविषयी परिपूर्ण माहिती देऊन ते प्रात्यक्षिकांसहीत सादर केले. ज्यामध्ये बैठी, उभ्याने, पोटावर तसेच पाठीवर झोपून अशी विविध प्रकारची आसने, प्राणायाम, ध्यान व शेवटी संकल्प इत्यादींचे दिलेल्या प्रोटोकॉल नुसार काटेकोरपणे पालन करून सादरीकरण करण्यात आले. अशाप्रकारे विविध आसनांचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण करत असताना दैनंदिन जीवनात योगाचे महत्व, सुदृढ व निरोगी जीवन उपभोगण्याकरीता त्यांचा उपयोग तसेच शारीरिक, बौद्धिक व सामाजिक जीवनातील योगाचे महत्व इत्यादी विषयी देखील त्यांनी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली.
याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. पी. ए. सावंत, विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक (बियाणे) डॉ. ए. व्ही. माने तसेच विद्यापीठ मुख्यालयातील कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वनशास्त्र महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी / विद्यार्थीनी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली, एकूण २३५ जणांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या बहुमोल अशा मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक व संचालक, क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम, डॉ. व्ही. जी. नाईक, विद्यार्थी कल्याण अधिकारी श्री. एन. ए. वागळे, विद्यापीठ क्रीडा अधिकारी श्री. एस. एस. थोरात, कृषि महाविद्यालयाचे शारीरिक प्रशिक्षण निदेशक डॉ. एम. आर. शिंदे व विद्यापीठ विजय क्रीडा संकुल येथील कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.