[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]
चार दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत एका मद्यधुंद व्यक्तीने चढुन अवमान करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर आंबेडकरी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. या प्रकारावरून आता रत्नागिरी येथील भिम युवा पँथर संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह शहरातील इतर पुतळ्यांना पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, दिनांक 19/03/2023 रोजी रत्नागिरी येथील एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना ही निषेधार्ह आहे. त्यामुळे इतर जिल्हयाप्रमाणे आपल्या जिल्ह्यात व रत्नागिरी शहरात देखील महापुरुषाची विटंबना करणे हे लोन पसरताना दिसून येत आहे. त्यामुळे याबाबतीत सदर व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी जिल्हा शासकीय रुग्णालय असून या ठिकाणी लोकांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटल येथे असणारी पोलिस चौकीची व्यवस्था ही प्रवेशव्दाराजवळच केली. तर पुतळ्याला देखील संरक्षण मिळेल. याबाबत गांभिर्याने विचार करावा. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबरोबर शहरातील इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना देखील पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी भीम युवा पँथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी भीम युवा पँथर संघटनेने अध्यक्ष प्रितम आयरे, कार्याध्यक्ष अमोल जाधव, उमेश कदम, रवींद्र पवार, ॲड प्रविण कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या बरोबर घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह शहरातील इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना देखील पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी भीम युवा पँथर संघटनेच्या वतीने केली आहे. या मागणीसंदर्भात पोलीस अधीक्षकांनी सकारात्मकता दाखवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
– अमोल जाधव, कार्याध्यक्ष-भीम युवा पँथर