(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यात भीम अनुयायांनी एकाच ठिकाणी बुद्ध-भीम जयंती साजरी करण्याचा निर्धार पक्का केला आहे. त्या अनुषंगाने ‘एक तालुका, एक जयंती महोत्सव समिती 2022’च्या वतीने दि.27 मार्च रोजी देवरुख येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विविध जाती-धर्मातील भीम अनुयायी बहुसंख्येने उपस्थित होते. ‘एक तालुका, एक जयंती’ विषयावर तालुक्यातील बौद्धांनी तसेच बौद्धेतरांनी एकत्र येऊन विश्वभूषण, विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. देवरूख येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगण येथून सकाळी 9 वाजता रॅली निघणार आहे. सदरच्या रॅलीची सांगता छत्रपती संभाजी महाराज यांच्या कसबा येथील पुतळा येथे होणार आहे.
या संदर्भात तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती ‘15 मे रोजी’ या ठिकाणी तालुक्यातील सर्व बौध्द बांधवांनी व सर्व संघटनांनी एकत्र येऊन संपन्न करूया, असे ठराव मंजूर करण्यात आले. दि.14 एप्रिल हा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म दिवस’ म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी उत्साहाचा दिवस. त्यामुळे या दिवशी देवरुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे दि.14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता देवरुख येथून रॅलीला सुरवात होईल. तर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगता करण्याचे ठरले आहे. तरी तालुक्यातील तमाम बुद्ध, शिव, रवीदास, भीम अनुयायांनी आपल्याकडे असलेल्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांसह रॅलीमध्ये सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी असे आवाहन आयोजकांतर्फे संयोजक, युवा उद्योजक रोहित तांबे यांनी केले आहे.