(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा ताम्हाने तथा ताम्हाने बौद्धजन कमिटी व माता रमाई महिला मंडळ (स्थानिक व मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने अशोका विजयादशमी ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्रकल्प अधिकारी (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) संतोष गमरे यांच्या उपस्थितीत तसेच गावचे सरपंच अमर सावंत, महिला अध्यक्षा मनीषा जाधव, ताम्हाणे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष संतोष जाधव यांच्या हस्ते धम्मध्वज फडकवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तथागत गौतम बुध्द व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना संतोष गमरे यांनी सुरुवातीलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिद्यांचे वाचन केले. त्यानंतर तथागत बुध्दांनी दिलेल्या चार आर्यसत्यचे स्पष्टीकरण देत बुद्धाने चार आर्यसत्याच्या अनुषंगाने आध्यात्मिक, आधिभौतिक,आधिदैविक अशी दुःखाची तीन कारणे, अष्टांगिक मार्ग यांची विस्तृतपणे मांडनी करून बुद्धाच्या सुख-दुःखात सकारात्मकता आहे. तसेच आपल्याला २२ प्रतिज्ञाचा मापदंड मिळाला की माणसाची प्रगती निच्छित होईल, असे गमरे यांनी उपस्थितांना सांगितले.
यापुढे ते म्हणाले, १४ ऑक्टोंबर किंवा अशोक विजयादशमी हा वाद घालू नका. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि.23.09.1956 रोजी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये बाबासाहेबांनी सांगितले आहे की, “बौध्द धर्म स्विकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे. येत्या दस-यास तारीख 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे.” या सूचनेत येत्या दस-यास असे स्पष्टपणे लिहिले असून ऐतिहासीक कारणे तर स्पष्टच आहेत. म्हणून हा वाद कायमचा आपण सोडून द्यायला हवा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सामाजिक अभिसरण होणे फार महत्वाचे आहे. डॉ बाबासाहेबांचे विचार हे उत्क्रांतीच्या पुढचे विचार असून ते आचरणात आपण आणले पाहिजे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमावेळी स्थानिक कमिटीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण जाधव, कोषाध्यक्ष अजित सावंत, प्रमोद सावंत, दिलीप सावंत, चंद्रकांत जाधव, महिला मंडळ सचिव मयुरी जाधव आदी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमिटीचे सचिव शेखर कांबळे यांनी केले.