(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि.३० नोव्हेंबर रोजी चाफे मयेकर महाविद्यालयात दिवसभर विविध क्रीडा स्पर्धा व बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.नानासाहेब मयेकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. आयुष्यात नानांनी आपले जीवन विधायक कामासाठी खर्ची घातले.शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि विशेषतः क्रीडा क्षेत्रात नानांनी देदीप्यमान कामगिरी केली.नानांच्या जयंतीनिमित्त ३० रोजी चाफे मयेकर महाविद्यालयात पाचवी ते सातवी प्राथमिक गट ,आठवी ते दहावी माध्यमिक गट,अकरावी ते बारावी उच्च माध्यमिक गटामध्ये शालेय स्तरावर खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, बुद्धिबळ, कॅरम, तसेच १०० मीटर ,२०० मीटर धावणे,तसेच खेळाचे धावते समालोचन करण्याच्या नावीन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या स्पर्धा नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुंड पुरस्कृत मोहिनी मुरारी शिक्षण संस्था, मालगुंड एज्युकेशन सोसायटी,मालगुंड यांनी आयोजित केल्या आहेत. २ ऑक्टोबर रोजी डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धा, सूत्रसंचालन स्पर्धा, पुस्तक परीक्षण स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,व्यंगचित्र स्पर्धा, वादन स्पर्धा या स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांचा बक्षीस समारंभ होणार आहे. यामध्ये चाफे, मालगुंड, जाकादेवी, काजुर्ली येथील स्पर्धकांचा सामावेश आहे.सदरच्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची बक्षीसं, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरी सर्व कार्यक्रमांना कै.डॉ. नानासाहेब मयेकरप्रेमी मंडळींनी, तसेच हितचिंतक, शिक्षणप्रेमी, क्रीडाप्रेमी यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण संस्थेचे धडाडीचे चेअरमन सुनिल बंधू मयेकर, नानासाहेब मयेकर फाउंडेशनचे कार्याध्यक्ष तसेच मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव, युवा नेते रोहित मयेकर यांनी केले आहे.