( चिपळूण )
‘कृषिभूषण’ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे हे बहुमुखी प्रतिभावंत आहेत. चोरगे यांनी ज्याला ज्याला स्पर्श केला त्याचं त्याचं सोनं झालेलं आहे. आज साहित्यिक आपल्याच कोशात जगत आहेत. त्यांचा समाजाशी संबंध राहिलेला नाही. असं चित्र दिसत असताना मातीचा स्पर्श झालेले असे चोरगे सरांचे व्यक्तिमत्त्व आहे. साहित्यिकाला समाजासाठी काहीतरी करावं लागतं. हा आदर्श वस्तुपाठ मोठ-मोठ्या लेखकांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. साहित्यिकांनी समाजाला योगदान देण्याची ही परंपरा खंडित होता कामा नये. समाजाशी एकरूप झालेले साहित्यिक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेला चोरगे महत्त्वाचे वाटत आहेत. यामुळे साहित्यिकांची समाजाभिमुखता वाढेल. डॉ. चोरगेंचा उल्लेख आधुनिक युगातील विश्वकर्मा म्हणून करायला हवा आहे, असे प्रतिपादन आद्य मराठी साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूण आयोजित ‘कृषिभूषण’ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे सत्कार समारंभ सोहोळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे, सौ. अंजली तानाजीराव चोरगे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोटिस्माचे उपाध्यक्ष आणि मोजक्या शब्दात सत्यदर्शन घडवणारे कवी आणि शाहीर राष्ट्रपाल सावंत यांनी ‘कोकण कृषी शिक्षण संस्था, नावारूपास आलिया आता’ हे चोरगे सरांवर लिहिलेले गीत सादर केले. प्रा. मिलिंद जोशी यांच्याहस्ते डॉ. तानाजीराव चोरगे तर कोमसापच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्ष डॉ. रेखा देशपांडे यांच्याहस्ते सौ. अंजली चोरगे मॅडम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. तानाजीराव चोरगे सरांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. यतीन जाधव यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे चोरगे सरांना स्मृतिचिन्ह, ग्रंथभेट आणि पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालनाला शशिकांत बाळासाहेब शेळके वाळवा यांचेकडून कुलदीप पोतदार यांच्या कुंचल्यातून साकारलेले ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे सरांचे तैलचित्र यावेळी भेट देण्यात आले. वाचनालयाच्या वतीने चित्रकार कुलदीप पोतदार तर कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण यांच्यावतीने डॉ. चोरगे सरांच्या हस्ते प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, प्रकाश देशपांडे, कुलदीप पोतदार, शशिकांत शेळके आदींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जोशी पुढे म्हणाले, ‘चोरगे सर उत्तम खेळाडू आहेत. आज साहित्यिकांमध्ये खिलाडूवृत्तीही कमी झालेली आहे. दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी आवश्यक असलेली निकोपता आपल्याकडे दिसत नाही. चोरगे सर साहित्य परिषदेवर आल्याने ही खिलाडूवृत्ती साहित्यिकांमध्ये वाढेल. महाराष्ट्राने कोकणाला डॉ. तानाजीराव चोरगे आणि प्रकाश देशपांडे ही अमूल्य भेट दिली आहे’ असेही जोशींनी नमूद केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, ज्येष्ठ लेखक आणि निवेदक प्रकाश पायगुडे म्हणाले, इथे चिपळूणच्या संस्थेच्या कार्यक्रमात व्यासपीठावर एक अध्यक्ष वगळता इतर कोणीही बसलेलं आम्हाला दिसत नाही. हा आदर्श आम्ही घ्यायला हवा आहे. डॉ. तानाजीराव चोरगे सरांचा आणि माझा परिचय १९९४ पासूनचा आहे. बोलण्यात आणि लेखनात प्रसंग रंगवून सांगण्याच्या चोरगे सरांच्या पद्धतीचे पायगुडे यांनी कौतुक केले. ‘मी स्कॉलर नव्हतो, पण प्रयत्न खूप करत होतो.’ या ‘झेप’ चरित्रातील वाक्यावर पायगुडे यांनी सरांच्या ठायी असलेल्या ‘नम्रपणा’बाबत विशेष टिप्पणी केली. ‘सदा सर्वकाळ हसायचं आणि दुसऱ्याला हसवायचं’ हाही सरांचा गुण अतिशय महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. ‘कृषिभूषण’ चोरगे सर लवकरच ‘महाराष्ट्र भूषण’ ठरोत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. मान्यवरांच्या हस्ते मृदंगी त्रैमासिकाच्या ‘डॉ. तानाजीराव चोरगे’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘मृदंगी’चे कार्यकारी संपादक आणि नामवंत कवी-समीक्षक अरुण इंगवले यांनी साहित्याच्या अंगाने समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वाचनालयाचे हे कवीवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या प्रेरणेने सुरु असलेले मृदंगी हे मुखपत्र आहे. गेल्या सहा वर्षातील मृदंगी त्रैमासिकाने एखाद्या साहित्यिकावर केलेला हा पहिलाच विशेषांक आहे. या विशेषांकातील लेखांची माहिती देतानाच वाचन चळवळीबद्दल अतिशय आस्था असलेल्या चोरगे सरांच्या दर्यादिलीबद्दलचे किस्से त्यांनी यावेळी सांगितले. आधुनिक काळातील विसंगती समोर आणणाऱ्या ‘माकडहाड डॉट कॉम’ सारख्या कथासंग्रहाचे लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना त्यांनी चोरगे सर हे कोकण भूमीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. कोकणला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. साहित्य क्षेत्रात आजवर चोरगे सरांनी केलेल्या लेखन कार्याला मिळालेली ही मान्यता अभिमानास्पद असल्याचे नमूद केले.
डॉ. तानाजीराव चोरगे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘आपल्या सपत्निक सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांची भूमिका महत्वाची राहिली आहे.’ चोरगे सरांना छंदातून नाट्य आवड जडली. त्यावेळी तमाशाप्रधान नाटके असायची. गणपत पाटील, सूर्यकांत, राजशेखर आदीं नाट्य अभिनेत्यांसोबत काम करायची संधी मिळाल्याचे सांगताना सरांनी या नटांच्या सोबत काम करतानाच्या हजरबाबीपणाचे किस्से सांगितले. केशवराव भोसले यांनी चालविलेल्या ‘ऐका हो ऐका’ नाटकातील एक किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. खेळ वगळता नाट्य आणि लेखन हा माझा भाग कधीही नव्हता असं ते म्हणाले. नाट्य आणि लेखनाकडे मी वळलो तेव्हा ओळखणारे अनेक चेहरे माझ्याकडे प्रश्नार्थक पद्धतीने बघायचे. दापोलीला कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य करत असताना आपण नाट्य आणि लेखन प्रांताकडे वळल्याचे त्यांनी सांगितले. चोरगे यांनी यावेळी आपल्या भाषणात आपल्या विविध पुस्तकांचे, सत्यकथेवर आधारित कादंबऱ्यांचे ‘कथाबीज’ उपस्थितांसमोर मांडले. पुस्तकांचे विषय ग्रामीण असल्याचे ते म्हणाले. पहिलं पुस्तक प्रकाशित करताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. दिलीपराज प्रकाशन संस्थेचे प्रकाशक राजीव बर्वेंची भेट झाल्यावर आपली पुस्तके त्यांच्याकडून प्रकाशित होऊ लागली. त्यांनीच आपल्याला लेखक तर प्रकाशराव देशपांडे यांनी आपल्याला साहित्यिक केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख डॉ. चोरगे यांनी केला. साहित्य निर्मिती ही समाजप्रबोधनासाठी, समाजसुधारणेसाठी आहे. साहित्याचा समाज सुधारणेवर परिणाम झाला आहे का ? साहित्यिक तरी सुधारले आहेत का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. शिक्षकी पेशातील लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची, वाचन करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली. आत्ताच्या पिढीला दोष देताना ‘आपण कसे आहोत ? आजच्या पिढीसमोर आदर्श कोण आहेत ?’ हेही अंतर्मुख होऊन तपासायला हवे असल्याचे ते म्हणाले.
आचार्य अत्र्यांनी काढलेल्या ‘महात्मा फुले’ चित्रपटाचा संदर्भ देत त्यांनी महापुरुषांना आम्ही जाती-धर्मात वाटून टाकल्याची खंत व्यक्त केली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाची शपथ मुलांना घ्यायला सांगताना ते समजून घ्यायची पहिली जबाबदारी शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची असल्याचे डॉ. चोरगे यांनी नमूद केले. लोकप्रतिनिधींनी साहित्य आणि संस्कृती जपणाऱ्या ‘लोटिस्मा’ सारख्या संस्थांच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली. गेली १५ वर्षे मी बँकेत काम करतो. बँकेच्या परीक्षेत नापास झालेल्या माणसाने तीन वर्षांच्या सततच्या प्रयत्नातून सर्वांच्या सहकार्याने बुडालेली जिल्हा बँक सक्षम बनवली. सत्य आणि नितीमत्ता नीट ठेवून काम केलं तर अवघड काही नाही, हे आपण समजून घेण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर तर आभार अंजली बर्वे यांनी मानले. कार्यक्रमात गुहागरच्या रश्मि वाचनालयाच्या वतीने राजेंद्र आरेकर आणि सहकारी यांनी चोरगे सरांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला साहित्य, शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर आवर्जून उपस्थित होते.