ऍड. विलास पाटणे, रत्नागिरी
डॉ. श्रीधर तथा तात्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील माखजन येथे १४ सप्टेंबर १९२९. रोजी झाला . मुंबईच्या पोद्दार इन्स्टिट्यूट मधून पदवी घेऊन १९५२ साली तात्या डॉक्टर झाले. सरकारी डॉक्टर म्हणून तात्या मार्गताम्हाणे गावात आले, तात्या मार्गताम्हान्याचे केव्हा झाले हे त्याना पण कळले नाही.
दिवस असो वा रात्र, रुग्ण गरीब असो वा श्रीमंत मदतीला धावून रुग्णावर उपचार त्यानी समर्पित भावनेने केले. खेडोपाडी रुग्णांना तपासण्यासाठी जात तेव्हा वैद्यकीय व्यवसाय ही सेवा आहे या व्रतस्थ निष्ठेने रूणसेवा प्रामाणिकपणे केली. तात्यानी प्रसंगी चालत जावून गरीबांची सेवा केली. गरीब पेशंटच्या घरी घोंगडीवर बसून त्यानी भाकरी खाल्ली. शेतकऱ्यांचे प्रश्न व दुःख समजून घेतले..सेवाभाव त्यांच्या वृत्तीत व प्रामाणिकपणा त्यांच्या रक्तात होता . समाज शिक्षित झाला पाहिजे याच ध्यासातून तात्यानी
समाजाला शिक्षण देऊन बदल घडविण्यासाठी ग्रामिण भागात अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या गरिबांच्या मुलांसाठी वसतिगृहाची सोय केली. चिपळूणच्या प्रतिष्ठीत परशुराम एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे २७ वर्षे तात्या अध्यक्ष होते .
तात्या गुहागरमधून जनसंघाचे उमेदवार म्हणून 1972 मध्ये पहिल्यांदा, जनता पक्षाचे म्हणून 1977 तर 85 व 90 मध्ये भाजपाचे आमदार म्हणून गुहागरमधून असे एकूण ४ वेळा निवडून आले .तात्यांच्या लोकप्रियतेचा पक्षाला फायदा झाला .आमदारकी त्यांच्या कामाच्या मागून आली .त्यासाठी त्याना रांगेत उभ राहण्याची अथवा पक्षांतर करण्याची वेळ आली नाही ..72 मध्ये जनसंघाचे केवळ पाच उमेदवार होते .तात्यानी कोकणाच्या प्रश्नाला विधानसभेत समर्थपणे वाचा फोडली. तात्यांच्या आमदारकीच्या कारकीर्दीला यावर्ष पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत
तात्यानी सार्वजनिक जिवनात काम करताना जातीच्या, पक्षाच्या कसल्याच भिंती उभ्या केल्या नाहीत, साऱ्या समाजाला त्यानी कुटंब मानल. पारदर्शक व्यवहार व समाजातील शेवटच्या माणसाच भल त्यानी आयुष्यभर पाहील. युवा मोर्चाचे संघटन जिल्हयात उभे करण्याकरीता तात्यानी मला मार्गदर्शन व मदत केली .स्व प्रमोदजी महाजन माझे घरी आले होते तेव्हा त्यानी तात्यांकडून जिल्हयामधील राजकारण व प्रश्न समजून घेतले. खेडमधील विकास परिषदेला त्यानी मोलाच सहकार्य केले.
विंचू दंशाने त्याकाळी अनेक लोक दगावत ,त्यावर उपाय म्हणून तात्यांनी विंचू दंशावरील लस शोधून संशोधन केले. राजकारणात चारित्र्याच्या आधारावर, निष्ठेने लोकांच्या भल्यासाठी राजकारण करणाऱ्या साध्या, सरळ, सज्जन माणसाची पिढी केव्हाच संपली. अशावेळी तात्यांची आठवण प्रकर्षाने येते.
तात्यांच्या स्मृतीस अभिवादन!