(नवी दिल्ली)
संविधान दिनाचे औचित्य साधून सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल 76 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयात घटनेच्या शिल्पकाराची प्रतिमा स्थापित झाल्याने विशेष आनंद व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रपती मुर्मू आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी डॉ. आंबेडकरांच्या सात फूट उंच प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर दोन्ही मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी केंद्रीय कायदे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, बार असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पुढाकाराने ही प्रतिमा सुप्रीम कोर्ट परिसरात साकारण्यात आली. सात फूट उंच पंचधातूच्या या प्रतिमेत डॉ. आंबेडकरांना वकिलाच्या गाऊनमध्ये, हातात संविधानाची प्रत या स्वरूपात साकारण्यात आले आहे. ही प्रतिमा मूर्तिकार नरेश कुमावत यांनी साकारली आहे.
यावेळी आपल्या संबोधनात राष्ट्रपती म्हणाल्या, विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मला देशातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळते. अशा प्रतिभाशाली युवांना न्यायपालिकेत आणून त्यांना देशसेवेच्या कामात सहभागी करून घेतले पाहिजे. त्यांच्या निवडीसाठी राज्यस्तरावर एखादी व्यवस्था असली पाहिजे.