(मुंबई)
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते राहुल बबन गायकवाड यांच्या माध्यमातून आधार बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने तब्बल १३२ किलो वजनाचा देशातील सर्वांत मोठा केक बनविला होता. या विक्रमी वजनाच्या केकची देशातील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. या संस्थेला या आगळ्यावेगळ्या विक्रमाचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम नुकताच मुंबईतील चेंबूरमध्ये पार पडला.
देशातील एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त सर्वांत मोठा केक बनविण्याचा विक्रम आता आधार बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या नावावर नोंदविला गेला आहे. या विक्रमी नोंदीचे प्रमाणपत्र प्रदान करण्याचा सोहळा नुकताच चेंबूर मधील सुभाषनगर समाज मंदिर हॉलमध्ये पार पडला. यावेळी आयोजक राहुल गायकवाड यांच्यासह इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या निवाडाधिकारी म्हणजेच जज करिश्मा शाह, स्विटेला केक कंपनीच्या पूनम दगालिया तसेच दादासाहेब सरगर, बाबुराव कोळेकर आणि सामाजिक क्षेत्रातील निवडक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबेडकरवादी चळवळीतील साहित्यिक आनंद म्हस्के यांनी केले.या विक्रमी केकचे वैशिष्टय़ असे की,हा केक कोणत्याही वातानुकूलित सुविधेचा वापर न करता एकाच जागेवरच बनविण्यात आला होता.एखाद्या रेकॉर्डसाठी नोंद व्हावी असे सर्व निकष या प्रयत्नांतून दिसून आल्याने या रेकॉर्डच्या प्रयत्नाची निश्चिती करण्यात आल्याचे करिश्मा शाह यांनी यावेळी सांगितले. पूनम दगालिया यांच्या तीन जणांच्या टीमने हा केक बनविला होता. एक महिन्यापासून या आगळ्यावेगळ्या प्रयत्नाची तयारी सुरू होती. हा केक कापल्यानंतर आंबेडकर जयंतीनिमित्त आलेल्या अनुयायांना वाटण्यात आला होता.