(रत्नागिरी / प्रतिनिधी)
काही दिवसापूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टारांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी मुदत देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळें शासकीय रुग्णालयात शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्यासह कार्यकर्ते सोमवारी दुपारच्या सुमारास धडकले. या आंदोलनाची शासनाकडून दखल घेऊन काही दिवसातच डॉ. सांगविलकर रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे डॉक्टरविना सलाईनवर असलेली आरोग्य यंत्रणा पुन्हा रुळावर येणार आहे. तोपर्यंत रुग्णालयातील प्रसूतीगृहात डॉ. सानप, डॉ. मदार व डॉ सुतार ह्यांना रुजू करून घेण्यात आले आहे. बाकीच्या समस्या लवकर सोडवण्यात येतील, असे रुग्णालयाच्यावतीने आश्वासन देण्यात आले.
प्रसूतीगृहात काम करणारे डॉ. विनोद सांगवीलकर यांची पदउन्नती नुसार बदली झाल्याने जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृहमध्ये डॉक्टर नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील समस्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी देवेंदर सिंग ह्यांच्या समवेत बैठक घेतली होती. या बैठकीत तात्काळ समस्या सोडविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास शिवसेना (ऊबाठा) आमदार राजन साळवी यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ फुले यांच्या दालनात बैठक घेतली. रुग्णालयाच्या परिस्थितीची माहिती घेतली. प्रसुती विभागातील ८० टक्के रुग्णांना डेरवण किंवा सीपीआरला हलवण्याची वेळ येते. गंभीर रुग्णांनी काय करायचे, आपली काही जबाबदारी आहे की नाही? आता काय परिस्थिती आहे. याबाबत डॉ. फुले यांनी सांगितले की, आम्ही सांगविकर यांना येथे पाठवावे, अशी मागणी केली आहे. डॉ. सानप व अन्य डॉक्टरांचे आठवड्याचे नियोजन केले आहे.
दोन दिवसात त्यांची येथे नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे; परंतु यापूर्वीही आम्ही रुग्णालयाचा कारभार सुधारण्याचा इशारा दिला होता. आता रुग्णालयाचा कारभार सुधारला नाही तर सेना स्टाईल आंदोलन करून रुग्णालयाला टाळे ठोकू असा सज्जड दम राजन साळवी यांनी दिला. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे व शिवसेना, महिला आघाडी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.