पुण्यात एका डॉक्टरने रुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. ३२ वर्षीय महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवून, तिची इच्छा नसतानाही वारंवार पाठलाग करत मानसिक छळही केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. अमित असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेने पुण्यातील कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी डॉ. अमितचे कात्रज भागात क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये पीडित महिला तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी या पीडित महिलेची डॉक्टरसोबत ओळख झाली. त्यानंतर डॉक्टरने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मोबाईल फोनवर मेसेज आणि कॉल करून तिच्याशी गोड गोड बोलून त्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. त्यानंतर तिचा हात धरून तिला आक्षेपार्ह पद्धतीने हात लावून परत सदर प्रकाराबाबत माफी मागण्याच्या बहाण्याने तिला क्लिनिकमध्ये बोलावले. यावेळी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतरही महिलेची इच्छा नसताना तिचा वारंवार पाठलाग करून तिला डॉक्टरने त्रास दिला. अखेर याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत, डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला.
ही घटना १ जुलै २०२२ पासून आतापर्यंत घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेने डॉक्टर विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली आहे. या प्रकरणी आरोपी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.