(खेड / भरत निकम)
सध्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. आरोग्य खात्याची घरोघरी जाऊन तपासणी करणारी यंत्रणा तोकडी पडत असल्याने गावातील ‘आशा’सेविकांची मदत घेतली जात आहे.
मुसळधार पाऊस, पुराचे थैमान पाठीमागील काही दिवसांपासून खेड शहरासह ग्रामीण भागातील काही गावात येऊन गेले आहे. पुर ओसरल्यावर पुरग्रस्त भागांची काळजी घेणे गरजेचे असताना संबंधित नगरपरिषद आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी दुर्लक्ष केले होते. पाण्याच्या भागात बराचसा काळ पाणी साचून डासांची उत्पत्ती झाली होती. यातून सर्दी खोकला थंडी ताप या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. स्वच्छतेसाठी आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही. त्यातून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत गेला आहे.
साथीचे आजार बळावत गेल्याने आरोग्य यंत्रणेला याकामी यंत्रणा अपुरी पडत गेली. अपुऱ्या यंत्रणेवर तपासणी झाली तर, वर्षभर साथ आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागेल. याकरिता गावोगावी नेमणूका दिलेल्या ‘आशा’सेविकांची मदत घेत सर्व्हेतून झपाट्याने कामाला गती दिली जात आहे. प्रत्येक कुटुंबातून माहिती संकलन करत ती आरोग्य यंत्रणेला मिळत आहे. या आधारे उपचारासाठी दिशा ठरविण्यात येत आहे. या साथीने आरोग्य यंत्रणेचे काम सोपे होते असेल तरी नागरीकांना डेंग्यू ची भिती कायम आहे.