( संगमेश्वर / प्रतिनिधी )
तालुक्यातील मांजरे कळकदेकोंड येथे डुक्कर समजून म्हशीची शिकार केल्याची खळबजनक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. मिलिंद महादेव चरकरी, निनाद धोंडु घाणेकर (दोन्ही रा.नरबे करबुडे ता.जि. रत्नागिरी) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून बंदूक आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती. शनिवारी सकाळी देवरूख येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर घटना अशी की, नरेंद्र रघुनाथ देसाई ( रा . मांजरे देसाईवाडी) यांनी आपल्या मालकीची म्हैस रानात चरण्याकरीता सोडली होती. मात्र सायंकाळ पर्यंत म्हैस घरी परत आली नसल्याने देसाई यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा.चे सुमारास ही म्हैस दिसून आली. यावेळी म्हशीची शिकार झाल्याचे निदर्शनास आले. म्हैशीच्या पुढील डाव्या पायावर बंदुकीने 6 गोळ्या झाडून तीला जखमी करून विकलांग केले होते. त्यानंतर नरेंद्र देसाई यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. चौकशी दरम्यान मिलिंद चरकरी व निनाद घाणेकर (दोन्ही रा.नरबे करबुडे ता.जि. रत्नागिरी) यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी डुक्कर समजुन म्हशीची शिकार केल्याचे कबूल केले. पोलिसांनी निनाद घाणेकर त्याचे ताब्यातील विनापरवाना बंदुक आणि काडतुसे जप्त केली आहेत. याबाबतचा अधिक तपास संतोष झापडेकर करत आहेत.