(रत्नागिरी)
पाली येथील डी. जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेमध्ये दिनांक 22 आणि 23 डिसेंबर या दिवशी वार्षिक क्रिडामहोत्सव खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला. या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकार घेण्यात आले. नर्सरी पासून इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये यश संपादन केले.
या क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण काल करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मराठा मंदिर पाली हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. पटेल सर, तांबोळी सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रविकांत सावंत, उपाध्यक्षा सौ. स्मितांजली सावंत, सौ. अनुष्का सावंत, सौ. सीमा जमानेकर, श्री. मिलिंद धाडवे, श्री. भंडारे, सौ. नागले, आदी मान्यवर उपस्थित होते.
या क्रीडा महोत्सवामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पारितषिके देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पारितोषिक मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. भविष्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुढे येण्याचे उत्तेजन दिले. सदरच्या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे मॅडम याचे कुशल व उत्कृष्ट असे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या क्रीडा विभागाने यासाठी विशेष मेहनत घेतली. सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकारी लाभले.