(रत्नागिरी)
पाली येथील डी.जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल प्रशालेमध्ये ‘विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक’ पार पडली. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांनी उद्याचे जागृत व सज्ञान नागरिक म्हणून मतदान करणे आपले आद्यकर्तव्य आहे, संविधानाने आपल्याला दिलेला तो अधिकार, हक्क आहे असे संबोधन सर्व विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थीनी प्रतिनिधी व इतर अकरा विभागांसाठी मतदान घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला मतदान केले. इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे अत्यंत गोपनीय पद्धतीने घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच जबाबदारी व आनंद दिसत होता. या निवडणूक प्रक्रियेची सर्व जबाबदारी प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीम. भोळे, श्रीम. कीर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या सर्व कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.