(देवरुख/सुरेश सप्रे)
विसाव्या शतकातील सुप्रसिद्ध डच चित्रकार विन्सेंट व्हॅनगॉग यांच्या चित्रांचा एक अभिनव नाट्यानुभव देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, डी कॅड येथे रविवारी १६ तारखेला सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. व्हॅनगॉगचा दृष्यानुभव त्याच्या चित्रात परावर्तित होताना पाहणाऱ्यालाही त्याची अनुभूती येते. याचे लेखक आयव्हिंग स्टोन असुन अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी अनुवाद केला आहे. संकल्पना, संकलन आणि दिग्दर्शन शेखर नाईक यांच्या या निर्मितीचा अनुभव व्हॅनगॉगच्या चित्रामधील दृकश्राव्य तसेच भाव यांचा प्रवास घडवणारा आहे.
संगित चैतन्य आडकर, प्रकाश योजना प्रणव सकपाळे, दृकश्राव्य संयोजन प्रसाद कुलकर्णी यांचे आहे. यामध्ये अश्विनी गिरी, धीरेश जोशी, सई लिमये, अमृत सामक, अभिवाचन करणार आहेत.
सदरचा कार्यक्रम कलारसिकांसाठी, कलेच्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. कलाप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या नाट्यानुभवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्राचार्य रणजित मराठे यांनी केले आहे.