(फुणगूस / एजाज पटेल)
डिंगणी मुख्य रस्त्यावरील ढोले स्टॉप ते शास्त्री पुल आंबेड पर्यंतचा नादुरुस्त रस्ता दुरुस्तीसाठी रस्त्यालगत खडीचे डेपो मारून दोन महिने उलटले मात्र अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही. हे काम आठ दिवसात सुरू झाले नाही तर देवरुख सार्वजनिक बांधकाम उप विभाग कार्यालय समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा भाजप चे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी सबंधित बांधकाम विभागाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असून या पूर्वी छोटे-मोठे अपघात झाल्याचेही सांगितले जाते. हा रस्ता दुरुस्त व्हावा या करिता कित्येक वर्षे ओरड सुरू आहे, मात्र दर वर्षी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरले जातात मात्र भरलेले खड्डे पहिल्या पावसातच उखडून परिस्थिती त्याच पूर्वपदावर येते. त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मांगणी जोर धरत होती. या मागणीला यश आले व रस्ता कामासाठी रस्त्यालगत खादीचे ढिग मारण्यात आले. त्यामुळे प्रवाशी जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
मात्र रस्त्यालगत खडीचे ढीग मारून दोन महिने उलटले तरी कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली नाही. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला तरी कामाची कोणतीच हालचाल नाही, असे असताना सबंधित विभाग मात्र याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे प्रवाशी जनतेच्या संतापाचा पारा चांगलाच चढला असून या रस्त्याचे काम आठ दिवसात चालू न केल्यास जनतेच्या समस्येसाठी नेहमी पुढाकार घेऊन पेठून उठणारा युवा नेता तसेच भाजप चे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी आठ दिवसात रस्त्याच्या कामास सुरुवात न केल्यास स्वतः देवरुख सार्वजनिक बांधकाम उपविभागासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन देवरुख सा.बां.उपविभागाला सादर केले आहे.