(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर-डिंगणी रस्त्यावरील खाडेवाडी येथील ८०० मीटर रस्त्यावर तब्बल २० लाख रुपये खर्च करून देखील काम निकृष्ट झाल्याचा येथील ग्रामस्थांनी आवाज उठवताच प्रशासन आणि ठेकेदाराची एकच धावाधाव उडाली. घाई गडबडीत तात्काळ सिलकोटचा थर मारून निकृष्टतता झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तरी देखील पितळ उघडे पडलेच. त्यामुळे ग्रामस्थ देखील आपल्या मागणीवर ठाम राहिले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड डिंगणी मार्गावर खाडेवाडी येथे जाण्यासाठी अंतर्गत रस्ता काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. कालांतराने रस्ता खराब होऊन मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने केली जात होती. त्याची दखल घेत ८०० मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी तब्बल २० लाख इतका निधी मंजूर करून पुढील प्रक्रिया राबवण्यात आली. स्थानिक पातळीवरील एका राजकीय पदाधिकाऱ्यांने या कामाचा ठेका मिळवला व काम सुरू देखील केले.
सुरुवाती पासूनच काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत होते. तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची योग्य ती देखरेख होत नसल्याने ठेकेदाराचे चांगलेच फावले, दर्जाहीन कामाचा सपाटा त्याने सुरूच ठेवला. अखेर ग्रामस्थ व वाहन चालकांनी यासंदर्भात आवाज उठवण्यास सुरुवात करून चौकशीची मागणी देखील केली. त्याबाबतचे वृत्त देखील प्रसिद्ध झाले आणि जणू निकृष्ट कामाचे बिंगच फुटले. साहजिकच ठेकेदार व अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अधिक फजिती होऊ नये म्हणून घाईघाईने सिलकोट मारून सर्वकाही झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
घाईघाईने झालेल्या कामामुळे अनेक ठिकाणी निकृष्ट काम साफ दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम असून या कामाची चौकशी झालीच पाहिजे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाचे बिल अदा करू नये अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. लोकांच्या चौकशी आणि बिल अदा न करण्याची मागणी सबंधित विभागाकडून धुकवण्याचा प्रयत्न केला गेल्यास तीव्र आंदोलनाचा बडगाही वेळप्रसंगी उघडण्याची वेळ आली तरी मागे पुढे पाहणार नाही, अशा भूमिकेतही येथील लोक असल्याचे समजते.