(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डाव्होसला जाण्यापेक्षा गुजरातला जावे, असा खोचक टोला शिवसेना गटाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, डाव्होसमधून काय येते ते माहित नाही, पण तुमच्या नाकाखालून उद्योग गेलेत ते आधी आणा. गुजरात आणि इतर राज्य जे उद्योग घेऊन गेलेत ते घेऊन आलात तर डाव्होसला जाण्यात अर्थ आहेत. डाव्होसला कसे करार होतात ते आम्हाला माहित आहेत. डाव्होसला जाऊन किती करार केले आणि किती कंपन्या आणल्या ते कोणी सिद्ध करू शकलेले नाही.
वेदांत फॉक्सकॉन, एअरबस, ड्रग्सपार्कसारखे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात येत होते, आले होते. ते तुमच्या डोळ्यांसमोरून गुजरातला घेऊन गेले. त्यामुळे डाव्होसला जाण्यापेक्षा गुजरातला जा, असा उपरोधिक टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. ते पुढे म्हणाले की, सगळ्या यंत्रणा सरकारच्या हातात आहेत. आता न्याय व्यवस्थेवरच हातोडा घालायचे काम बाकी आहे, त्याचेही काम सुरू आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. यावरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्प कार्यान्वित झाले. त्याच प्रकल्पासाठी हे सरकार पंतप्रधानांना बोलावून श्रेय घ्यायचे काम करत आहे. यामुळे पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचा प्रयत्न आहे. ज्या प्रकल्पांच्या योजना आम्ही केल्या, त्यांचे उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेबाबत महत्त्व वाटत नसेल तर त्यांना ते करू द्या, असेही राऊत म्हणाले.