(ठाणे )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र आणि नाव असलेल्या राख्या बाजारपेठेत हातोहात संपत असून, याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. रक्षाबंधननिमित्त ठाण्याच्या बाजारपेठेत विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आणि अनोख्या राख्यांची दुकान सजली असून, या राख्यांमध्ये शिंदे यांचे नाव आणि छायाचित्र असलेल्या राख्या लक्ष वेधून घेत असून या राख्याना अधिक मागणी आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ठाण्यात या राख्यांचीच चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. या राख्या हातोहात संपत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे भाऊ असून संकटात ते आमचे रक्षण करतील, या भावनेने या राख्या बनवल्या असल्याचे ठाण्यातील राखी विक्रेत्या कल्पना गांगर यांनी म्हटले आहे व महिलाही अशाच उद्देशाने त्या राख्या विकत घेत असल्याचे सांगितले. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेल्या राख्या बाजारात पाहायला मिळाल्या होत्या. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या फोटो असलेल्या राख्यांची ठाण्यात जोरदार विक्री सुरू आहे.