(मुंबई)
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा सुरू आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवत वरळी विधान सभेतून निवडणूक लढवण्याचे आव्हान केले होते. दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी येथे जाहीर सभा घेत आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर दिले होते. दरम्यान, आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाने नवी चल खेळली असून आदित्य ठाकरे यांचे चुलत बंधु निहार ठाकरे यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. निहार ठाकरे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी दिली जाण्याबाबत चाचपणी चर्चा सुरु आहे. आता आदित्य ठाकरेंना वरळीतच शह देण्यासाठी शिंदे गटानं मोठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध आव्हान उभं करण्यासाठी निहार ठाकरेंना उतरविणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिव संवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले होते. ‘हिंमत असेल; तर मुख्यमंत्रिपद आणि आमदारकीचा राजीनामा द्या. लोकांमध्ये उतरून निवडणूक लढवून दाखवा,’ असे वक्तव्य आदित्य यांनी केले होते. ‘तुम्ही ठाण्यात लढणार असाल तर मी ठाण्यात येतो; अन्यथा माझ्या वरळी मतदारसंघात माझ्याविरुद्ध लढून दाखवा,’ असे त्यांनी म्हटले होते.
आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी त्यांचे चुलत बंधु निहार ठाकरे यांना मोहरा बनवत आता त्यांना वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीला उभे करण्याची खेळी खेळली जात आहे. असे झाल्यास दोही चुलत बंधु समोरासमोर येणार आहेत. निहार ठाकरे जर मैदानात उतरले तर आदित्य ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. थेट दोन भावात लढत होणार असल्याने ठाकरे कुटुंबातील संघर्ष देखील या निमित्ताने चव्हाट्यावर येणार आहे.अशी लढत राज्यासाठी चर्चेचा विषय ठरणार आहे.
निहार हे उद्धव ठाकरे यांचे सर्वांत मोठे बंधू दिवंगत बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी आयोजित केलेल्या जाहीर सभेत निहार ठाकरे यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. निहार हे ठाकरे व्यवसायाने वकील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर लढाईत ते त्यांना कायदेशीर सल्ला देण्याची भूमिका पार पाडत आहेत.