(मुंबई)
सत्ता आणि शिवसेनेवरील वर्चस्वासाठी गेले दीड वर्ष सुरू असलेल्या उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाचा फैसला आज (बुधवारी) होणार आहे. शिवसेनेच्या आमदारांविरोधात दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निर्णय देणार असून या निर्णयावर शिंदे यांचे व त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे भवितव्य ठरणार आहे. निकालाच्या दोन दिवस आधी झालेल्या नार्वेकर व मुख्यमंत्र्यांमधील गुप्त भेटीबद्दल जोरदार आक्षेप घेताना देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवणारा निकाल असेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली तर लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते व आमच्याच बाजूने निकाल लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ होऊन सत्तातर झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. सत्तेबरोबरच शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्हही ठाकरेंकडून हिसकावून घेतले. तेव्हापासून शिवसेनेच्या दोन गटांत घमासान संघर्ष सुरू आहे. एक वर्ष सर्वोच्च न्यायालयात लढाई झाल्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू होती. या लढाईचा फैसला आज दुपारी होणार आहे.
ठाकरे गटाचा दावा मान्य झाला व पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळेल. शिंदे अपात्र ठरणारच नाहीत व ठरले तरी तेच मुख्यमंत्री राहतील. त्यांना विधान परिषदेवर निवडून आणू, असे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले आहे मात्र हे सोपे नाही, असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे विजयाची खात्री असूनही शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सोबत उरलेल्या आमदारांपैकी आदित्य ठाकरे वगळता उर्वरित १४ जणांविरुद्ध शिंदे गटाने अपात्रता याचिका दाखल केली आहे. ते अपात्र ठरणार का? हाही कळीचा मुद्दा असणार आहे. तसे झाल्यास गेले दीड वर्ष संघर्ष करणा-या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसेल; पण त्याची सहानुभूतीही मिळणार आहे, ही जमेची बाजू असेल. निकालाबाबत शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून परस्परविरोधी दावे केले जात असले तरी यामुळे राज्यातले राजकीय वातावरण मात्र तापले आहे.
बहुमत, मेरिट आमच्या बाजूला : मुख्यमंत्री
विधानसभा अध्यक्षांकडे या प्रकरणाची विस्तृत सुनावणी झाली आहे. आता निकाल येईल. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. विधानसभा आणि लोकसभेत आमच्याकडे बहुमत आहे. आमच्याकडे अधिकृत चिन्ह आहे. मेरिटप्रमाणे निकाल अपेक्षित आहे. नियम सोडून कुठलेही काम केलेले नाही. घटनाबाह्य काम आम्ही केलेले नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर योग्य कायदेशीर अशा प्रकारचाच निर्णय अध्यक्ष घेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
घटनात्मक पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे : शरद पवार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीका केली. ज्यांच्याकडून निकालाची अपेक्षा आहे, त्यांनी ज्यांच्यावर सुनावणी सुरू आहे त्यांची भेट घेणे हे संशयास्पद आहे. हे केले नसते तर या पदाची प्रतिष्ठा आणखी चांगली राहिली असती, असे पवार म्हणाले.
फक्त दोन आमदार सेफ
शिवसेनेचे फक्त दोन आमदार वगळता इतर सगळ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. ज्या आमदारांना अपात्र व्हायचा धोका नाही त्यात आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे बाळासाहेबांचे नातू असल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करणार नसल्याचं शिवसेना शिंदे गटाकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. तर ऋतुजा लटके यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढलेली नाही, त्यामुळे त्यांची आमदारकीही सुरक्षित राहणार आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके मशाल चिन्हावर निवडणूक लढल्या होत्या, त्यामुळे त्या शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार आहेत. शिवसेना ठाकरे गटानं सर्वात आधी ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावले, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, लता सोनवणे आणि यामिनी जाधव यांच्या अपात्रतेबाबत निकाल दिला जाणार आहे.
माझा निर्णय कायद्याला धरूनच राहणार : राहुल नार्वेकर
माझ्या मतदारसंघातील किंवा राज्याशी निगडित प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य आहे. अशा प्रश्नांसंदर्भात राज्यातील कार्यकारी मंडळातील मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्याची गरज असेल, तेव्हा मला कोणाला भेटण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असे सुनावतानाच आमदार अपात्रता प्रकरणात कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. आमदार अपात्रताप्रकरणी नार्वेकर यांच्या लवादासमोर सुनावणी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी या भेटीबाबत आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. यावर बोत्न्ताना, माझा निर्णय कायद्याला धरूनच असणार आहे, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.