(रत्नागिरी)
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधू नेत्यांचा आज शनिवारी, ६ मे रोजी एकाच दिवशी रत्नागिरीमध्ये दौरा होत आहे. उद्धव ठाकरे हे बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीविरोधी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधतील. तर राज ठाकरेंची रत्नागिरीत सभा होणार आहे.
उद्धव ठाकरे हे आज सकाळी १० वाजता साखरकोंब येथे हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. तेथून ते बारसू येथील कातळशिल्पाला भेट देऊन गिरमादेवी येथे ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दुपारी ते महाडला रवाना होणार असल्याचे समजते, तर राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असून रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी ५ वाजता सभा घेणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली
राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थनार्थ सध्या चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. याचबरोबर प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजपसह विविध संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चालाही पोलिसांनी मनाई केली आहे.