(नागपूर)
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सत्ताधा-यांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आले. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले गेले आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी गृहमंत्री फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना केली. दरम्यान, या आरोपानंतर ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये आले असून, उद्धव ठाकरेंसह संपूर्ण टीम आज नागपुरात येत असून या आठवड्यात राजकीय धमाका करण्याचा इशारा खा. राऊत यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आज सकाळी नागपुरात दाखल होणार आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि राऊत यांचा आजचा नागपूर दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. उद्धव ठाकरे हे अधिवेशनात सहभागी होणार आहेत, तर संजय राऊत विधिमंडळ भेट घेणार आहेत.
नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजपासून सुरू होणारा शेवटचा आठवडा असेल. पहिल्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार गोंधळ झाला. यावेळी दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना घेरण्यात आले होते. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांकडून दिशा सालियान प्रकरण काढले गेले. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी फडणवीस यांनी एसआयटीचीही स्थापना केली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
आदित्य ठाकरे कायदेशीर लढाई लढणार असल्याची माहिती मिळत आहे. दिशा सालियन प्रकरणात त्यांच्यावर जे आरोप केले, त्याबाबत अब्रुनुकसानीचा दावा आदित्य ठाकरे ठोकणार आहेत.