(मुंबई)
आम्ही निवडणुकीचा सामना केला आणि लोकांचा विश्वास जिंकला, उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर नेला अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तर शासन आपल्या दारी या योजनेमुळे महाराष्ट्रातील करोडो जनतेला लाभ झाला आहे, लोकांना टीकेचे व टोमण्यांचे नाही तर विकासाचे राजकारण पाहिजे असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ महिन्यांत महाराष्ट्राला विकासाची जी नवी दिशा दिली, राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले, आज महाराष्ट्रातील १३०० ग्रामपंचायतींवर महायुतीचा झेंडा फडकला आहे, ४५० सरपंच निवडून आले आहेत,याचाच अर्थ ७०% निकाल हा आमच्या बाजूने लागला आहे. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाने उत्तर दिले आणि महाराष्ट्राच्या जनतेने विकासाच्या बाजूने मतदान केले. कोणतेही चिन्ह नसल्याने ही निवडणूक आम्ही जिंकलो असे विरोधक बोलले, पण कोणतेही चिन्ह नसताना जर ७०% जागा आम्ही जिंकू शकतो, तर धनुष्यबाण असल्यावर आम्ही काय करू शकतो याचा विचार देखील विरोधकांनी करावा. आम्ही निवडणुकांना कधीही घाबरत नाही. आम्ही निवडणुकीचा सामना केला आणि लोकांचा विश्वास जिंकला, तर उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर नेला. नुसती टीका करणे, विकासावर न बोलणे, प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारणे याला प्रत्युत्तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देण्यापेक्षा ग्रामीण भागातील जनतेने दिली यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणार, आजचा ग्रामपंचायतीचा निकाल ही त्याची नांदी आहे, असे वक्तव्य उदय सामंत यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील १५ महिन्यांत जे काम केले, त्यावर जनतेने आपला विश्वास दाखवला आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत घेऊन गेलो, म्हणून राज्यातील जनतेने आम्हाला त्यांच्या हृदयात स्थान दिले व ज्यांना घरी बसायची सवय होती त्यांना घरी बसवले. गेल्या वर्षभरामध्ये शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत करोडो लोकांना लाभ देण्याचे काम आपल्या महायुती सरकारने केले आहे.
महिलांना एसटी प्रवासामध्ये ५०% सूट, जेष्ठांना मोफत प्रवास, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी ६,००० रुपये टाकण्याचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर राज्य सरकारतर्फे देखील प्रत्येकी ६,००० रुपये म्हणजे एकूण १२,००० रुपये शेतकऱ्याला मिळतील याची सोय केली, आतापर्यंत एकूण १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकले. शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा दिला. या आधीच्या सरकारने फक्त आश्वासने दिली होती, पण आमच्या महायुती सरकारने फक्त जनतेचा विकास करण्याचे काम केले आहे. लोकांना टीकेचे व टोमण्यांचे नाही तर विकासाचे राजकारण पाहिजे, हेच आजच्या निकालाने महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील याची सुरवात आता झाली आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.