(मुंबई)
पाच वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात सामंजस्य करार करताना ठरल्याप्रमाणे प्रेयसीला ५० लाख रुपये दे, नाहीतर तुला आम्ही पुन्हा तुरुंगात पाठवू , अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली याला दिली आहे.
२०१८ मध्ये अरमान कोहलीने त्याची पूर्वीची प्रेयसी नीरू रंधवा हिला पायर्यांवरून ढकलले होते. त्यात ती जखमी झाली होती. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर कोहलीला अटक झाली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोहली आणि नीरु रंधवा यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यामुळे न्यायालयाने एफआयआर रद्द करून कोहलीची तुरुंगातून सुटका केली होती. परंतु या सामंजस्य करारानुसार ठरलेले ५० लाख रुपये कोहलीने नीरु हिला अद्याप दिलेले नाहीत. कोहलीने धनादेश दिले, तेही बँकेत वटले नाहीत. त्यामुळे नीरु रंधवा हिने न्यायालयात धाव घेत कोहली याच्यावरील एफआयआर रद्द करण्याचा आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने ठरलेले ५० लाख रुपये दे, नाहीतर एफआयआर रद्द करण्याचा आदेश मागे घेऊन तुला पुन्हा तुरुंगात पाठवू, असा सज्जड दम न्यायालयाने कोहलीला दिला आहे. तसेच सदर सुनावणी १८ जुलैपर्यंत तहकूब केली आहे.