(महाड)
दोन ट्रक चालकांमध्ये झालेल्या वादावादीतून एका ट्रकवरील तरुण क्लीनरचा खून झाल्याची घटना महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये 4 एप्रिलला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्यावर ट्रक उभा करण्यावरून वाद उफाळून आला आणि त्यातून खून करण्यात आला. खून करणाऱ्या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ रामदास बिंद (वय 19, रा.उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रांमधील इंडियन डिटर्जंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गेटसमोर ट्रक चालक अंगद धर्मराज बिंद, त्याच्या ट्रकचा क्लीनर सौरभ बिंद (राहणार उत्तर प्रदेश) आणि इंद्रजीत रामखेलावन पटेल (राहणार उत्तर प्रदेश ) यांच्या मध्ये ट्रक उभा करण्यावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून इंद्रजित पटेल याने रात्री साडेदहाच्या सुमारास दुसऱ्या ट्रक चालकाने क्लिनर सौरभ बिंद याच्यावर एका हातात चाकू व एका हातात व्हील पाना घेऊन हल्ला केला. इंद्रजीत याने सौरभ याच्या मानेमध्ये चाकू खुपसून त्याला ठार मार मारले. खून केल्यानंतर लपून बसलेल्या ट्रक चालक इंद्रजित पटेल याला पोलिसांनी अटक केली आहे.