महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच भाजी मार्केट मध्येही नवे नवे उच्चांक पहायला मिळत आहेत. पेट्रोल-डिझेल, दैनंदिन वापरात येणाऱ्या आवश्यक गोष्टींचे दर गगनाला भिडले असतानाच आता टोमॅटोच्या दरात सुद्धा दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. टोमॅटोचे किरकोळ दर तब्बल ७० ते १०० रुपये प्रति किलो झाले आहेत. इंधन दरवाढीचा परिणामुळे वाहतूक खर्च, मजुरीचा खर्च यात दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तसेच तापमान वाढीमुळे टोमॅटोचे उत्पादन कमी होत असून टोमॅटोची आवक ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पंधरा दिवसापूर्वी घाऊक बाजारात २० रुपये प्रति किलोने विकले जाणाऱ्या टोमॅटोच्या दरात अचानक दुपटीपेक्षा वाढ झाली असून सद्यस्थितीला उच्च प्रतीचा टोमॅटो जवळपास १०० रुपये प्रति किलोने विक्री केला जात आहे. राज्यातील वाढत्या तापमानाचा चांगलाच फटका टोमॅटोला बसला आहे. टोमॅटोची आवक घटल्याने किरकोळ बाजारात याचा फायदा घेऊन ग्राहकांकडून सर्रासपणे अवाजवी दर आकाराला जात आहे.