(नवी दिल्ली)
इंटरनेट, स्मार्टफोनच्या चांगल्या वापराबरोबरच गैरवापरही वाढला आहे. लहान मुलांचे आक्षेपार्ह फोटो वा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होण्यावर; तसेच चाईल्ड पोर्नोग्राफीवर आळा घालण्यासाठी मेटा तसेच नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रेनने (एनसीएमईसी) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ‘टेक इट डाऊन’ हा उपक्रम सुरू केला आहे.
इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आला आहे. हल्ली प्रत्येकजण समाजमाध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. अनेकांनी तर समाजमाध्यमांतून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण केले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ब्लॉगिंग आदींद्वारे वेगवेगळे विषय हाताळत कंटेन्टनिर्मिती केली जात आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म मनाप्रमाणे काम करण्याची संधी, हवे ते विषय हाताळण्याचे स्वातंत्र्य आदींमुळे अनेकांनी नोकरी सोडत पूर्णवेळ डिजिटल क्षेत्रात काम करण्यास प्राधान्य दिल्याचे आपण पाहतो. यातून दरमहा लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
इंटरनेट, सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अनेक सकारात्मक गोष्टी करता येत असताना काही नतद्रष्ट मंडळींकडून या माध्यमांचा गैरवापर केला जात आहे. गैरप्रकार करण्याच्या हेतूने काही लोकांकडून लहान मुलांचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल केले जातात. चाईल्ड पोर्नोग्राफीच्या माध्यमातून खंडणी मागण्याचाही प्रकार केला जातो. यातून प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
ही बाब लक्षात घेता मेटा आणि नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रेनने पुढाकार घेत टेक इट डाऊन हा उपक्रम सुरू केला आहे. १८ वर्षांखालील एखादा लहान मुलगा किंवा मुलगी चाईल्ड पोर्नोग्राफीची शिकार होते किंवा त्यांचा आक्षेपार्ह फोटो, व्हीडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यास तो मजकूर किंवा व्हीडीओ हटवण्यासाठी संकेतस्थळावर तक्रार दाखल करता येते. या तक्रारीवरून व्हायरल आक्षेपार्ह फोटो वा मजकूर शोधून हटवता येतात.