(क्रीडा)
टी-२० मालिकेत सध्या सर्वोत्तम फॉर्मात असलेला भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव ८९० गुणांसह आयसीसी टी-२० मध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. तर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान ८३६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयसीसीने नुकतीच टी-२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. यात सूर्यकुमारचा सर्वोत्कृष्ट फलंदाज घोषित करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात सूर्याची बॅट तळपली होती. न्यूझीलंडविरुद्धही त्याने 51 चेंडूत 111 धावा काढत जबरदस्त टी-२० शतक ठोकले. न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वेचे ७८८ रेटिंग गुण असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ७७८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम ७४८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
याशिवाय इंग्लंडचा डेव्हिड मलान ७१९ गुणांसह सहाव्या, न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स ६९९ गुणांसह सातव्या, दक्षिण आफ्रिकेचा रिले रोसो ६९३ गुणांसह आठव्या, ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ६८० गुणांसह नवव्या आणि श्रीलंकेचा पाथुम निसांका ६७३ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.