(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील टिके येथील बोगद्यात रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली होती. या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुणाल विजय कांबळे ( ४१, रा. सांताक्रुज, मुंबई, सध्या रा. मालवण, सिंधुदुर्ग ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबत रेल्वे ट्रॅकमन विनोद तुकाराम गावकर यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली.
त्यानुसार बुधवारी सकाळच्या सुमारास विनोद गावकर रेल्वे ट्रॅकची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना टिके येथील बोगदा क्र. ४० मध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून कुणालच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. गुरुवारी कुणाल कांबळेच्या नातेवाईकांनी रत्नागिरीत येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.