(रत्नागिरी)
सोमवारी जिल्हा रूग्णालयाबाहेर विचित्र अपघात घडला. भरधाव मारुती इको कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ही कार जिल्हा रूग्णालयाबाहेरील चहाच्या टपरीत घुसली. या टपरीला लागून असलेल्या विद्युत पोलवर कार जाऊन धडकली. मनोरुग्णालय रस्त्यावर उतारात आले असताना अचानक स्टेअरिंग लॉक झाले. यामुळे त्यांचे कारवरचे नियंत्रण सुटले. या अपघातात चालकासह अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी चालकाला उपचाराकरिता कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
सुर्यकांत अनंत पिलणकर (वय ४५, रा. कोळंबेफाटा, रत्नागिरी) असे गंभीर जखमी मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास जयस्तंभ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालक सुर्यकांत पिलणकर मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ६४६१) घेऊन रात्री मारुती मंदिरहून कोळंबे येथे जात होते. मनोरुग्णालय रस्त्यावर उतारात आले असताना अचानक मोटारीवरील ताबा सुटून मोटारीचे स्टेअरिंग लॉक झाले. पिलणकर यांना गाडी न आवरता आली नाही ती थेट जिल्हा रुग्णलयाच्या बाजूला असलेल्या चहा टपरीवर जाऊन आदळली. या अपघातात इलेक्ट्रीक वायचा पोल त्या गाडीच्या बॉनेटला कापून आत गेला. यामध्ये चालकाच्या डोक्याला पोल चा मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. तर मोटारीत बसलेला त्याचा सहकारी महेश दिगंबर चव्हाण (वय ५१, रा. तोणदे, रत्नागिरी) हा देखील जखमी झाला.
अपघातानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांनी तात्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चालक सुर्यकांत पिलणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तात्काळ त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले. तर महेश चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळाताच शहर पोलिसांनी येऊन पंचनामा केला. शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस अमंलदार करत आहेत.