(मुंबई/ क्रीडा प्रतिनिधी)
मुंबईच्या टाटा एअर इंडियाने “टाटा उधोग समूह-क्रीडा विभाग” आयोजित अखिल भारतीय आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेत पदार्पणातच अंतिम विजेतेपद पटकाविले. एअर इंडियाचा प्रो-कबड्डी स्टार व राष्ट्रीय खेळाडू प्रशांत चव्हाण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. मिठापुर गुजरात येथील टाटा केमिकल कंपनीच्या आवारातील क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने टाटा स्टीलचा ४५-१४ असा सहज पाडाव करीत अंतिम विजेतेपदाचा चषक उंचावला.
राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या एअर इंडियाने सामन्याची सुरुवात आक्रमतेने करीत पहिल्या डावातच २१-०५ अशी सामन्यावर भक्कम पकड बसविली. दुसऱ्या डावात देखील तोच जोश कायम राखत हा सामना ३१ गुणांनी आपल्या नावे केला. प्रशांत चव्हाण याचा नेत्रदीपक अष्टपैलू खेळ त्याला नवनाथ जाधवची मिळालेली चढाईची, तर विजय घाडीगांवकर, आदिनाथ गवळी यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हा विजय सोपा झाला. एअर इंडियाच्या नवनाथ जाधवला स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईच्या खेळाडूचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत भारतातील टाटा उधोग समूहातील ७ संघांनी सहभाग घेतला होता. त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. अ गटात गतविजेते टाटा स्टील, टाटा केमिकल, टाटा पॉवर हे तीन संघ होते, तर ब गटात टाटा एअर इंडिया, टाटा टायटन, टाटा मोटार, टाटा व्होल्टाज या चार संघांचा समावेश होता. साखळी सामन्यात एअर इंडियाने टाटा टायटनला ४४-२३, टाटा मोटारीला ३५-११, तर टाटा व्होल्टाजला ३३-११ असे पराभूत करीत बाद फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत एअर इंडियाने टाटा पॉवरचा प्रतिकार ४७-१५ असा मोडून काढत अंतिम फेरीत धडक दिली होती.
एअर इंडिया एकेकाळी अर्जुन, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतर राष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेला संघ होता. देशभरात पहिल्या चार संघात त्याची गणना होत असे. पण आज खेळाडू भरती होत नसल्यामुळे तो मागे पडत चालला आहे. या संघाला उभारी देण्याकरिता तरुण खेळाडूंची भरती होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.