(रत्नागिरी)
शहरातील झाडगाव महावितरण कार्यालयाजवळील भागात बैलाला दांडक्याने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वा. सुमारास घडली होती.
विवेक विष्णू जोशी (रा. टिळकआळी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात संध्या अनिल कोसुंबकर (रा. रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ३० नोव्हेंबर रोजी संशयित विवेक जोशी हा झाडगाव महावितरण कार्यालयाजवळ एका मोकाट बैलाला दांडक्याने मारहाण करत होता. फिर्यादी कोसुंबकर यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला बैलाला मारण्यापासून रोखले. तसेच मारण्यामागचे कारण विचारले असता, त्याने ही सर्व मोकाट गुरे असून परत जर या ठिकाणी आली तर आपण त्यांना मारणारच, तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगितले.
दरम्यान, कोसुंबकर यांनी जखमी बैलाला गोशाळेत पाठवले असून शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरोधात भा.दं. वि. कायदा कलम ४२९ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.